Friday 12 April 2013

टोलनाका की लूटनाका?


                                        टोलनाका की लूटनाका?
राष्ट्रीय महामार्गावर दररोज कितीतरी वाहने प्रवास करतात. सध्या सामान्य माणसाला राष्ट्रीय महार्गावरील प्रवास खूपच अवघड व महाग ठरत आहे. आपण बघतो की राष्ट्रीय      
महामार्गावर खूप टोलनाके उभारलेले आहेत. या टोलनाक्याच्या दराने सर्वसामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागली जाईल अशी स्थिती निर्माण केली गेली आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच राष्ट्रीय 
महामार्गावर असे टोलनाके आहेत ज्यांच्या रस्ता बांधणीसाठी आलेल्या खर्चाची वसुली पूर्ण झालेली असूनही, त्यापेक्षा अनेकपटीनी पैसा सर्वसामान्य माणसाकडून वसूल केला जात आहे. कारण ह्या टोलनाक्याचे कंत्राटदार दुसरे तिसरे कोणीही नसून बऱ्याचश्या राजकारण्यांचे सगेसोयरेच आहेत. त्यामुळे ह्या भक्कम पाठिंब्याच्या आधारे त्यांनी उघडपणे जनतेच्या पैश्यांची लयलूट चालवली आहे. सामान्य माणसाचे यांमध्ये खूप हाल होत आहेत. सरकार ओरडून सांगते की जनतेच्या हिताला प्राधान्य दिलं जाईल, मात्र टोलनाक्याच्या ह्या उदाहरणातून जनतेचे अहितच होइल, अशा योजना सरकार राबवतांना दिसत आहे. बाजारात पोटासाठी लागणाऱ्या दहा रुपयाच्या पालेभाज्याचा भाव करणारा सर्वसामान्य माणूस आज टोलनाक्यावर तीस ते चाळीस रुपये खर्च करतोय याचा विचार तरी राजकारणाच्या 'राजा'ने  केला आहे का? निवडणूक आली की जनतेकडून मतांची भिक मागायची अन नंतर त्यांच्याच पैशाची लूट करायची अशी राजकारण्यांची आता मनोवृत्ती बनत चालली आहे. त्याच्या दृष्टीने जिथे "अर्थ " आहे आज त्याच कामांना अर्थ येत चालला आहे. थोडक्यात टोलनाक्याच्या या प्रश्नावरील अर्थकारण बाजूला ठेवून समाजहितासाठी सरकारने आता काहीतरी पाऊल उचलने  गरजेचे आहे.
                                                                                                      -   शुभम तेलभाते

No comments:

Post a Comment